Meet your Life Partner

Search Your World

Friday, January 13, 2012

जे महाजनांच्या घरात झाले ते मुंडेंना आपल्या घरात करायचेय का?

 ज्येष्ठ बंधू पंडितअण्णा मुंडे यांचा पत्रकार परिषदेत सवाल.
- काका-पुतण्याची संपली आता भावा-भावात रंगली शाब्दिक चकमक.

बीड। दि. १२ (प्रतिनिधी)
आम्हाला घर तोडायचे नाही आणि पक्षही सोडायचा नाही, परंतु जर मुंडेंची इच्छाच आमच्या घरात राहायचे आणि आम्हाला पक्षातून काढायचे असेल तर आमचा नाईलाज आहे. आपल्या पत्नीच्या आणि मुलीच्या तोंडचे ऐकून मुंडेंना जे महाजनांच्या घरात झाले ते आपल्या घरात करायचे आहे का,असा भावनिक सवाल खा. गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू पंडितअण्णा मुंडे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
मुंडे परिवारातील वादापासून आतापर्यंत पडद्याआड राहिलेले खा. मुंडे यांच्या ज्येष्ठ बंधूंनी आता थेट मैदानात येऊन आपल्या भावना बोलून दाखविल्याने जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. शिवाय आता आमच्यात नात्याचे राहिलेयच काय ? असा सवालही त्यांनी केला. आम्ही भाजप सोडला नाही. पण आम्हाला काढायचेच ठरविले तर आमचे रस्ते मोकळे आहेत. आता पक्षाच्या भूमिकेमुळे आम्ही अर्ज भरावे की नाही असे वाटते. तरी आम्ही प्रतीक्षेत आहोत. आतापर्यंत मुंडेच्या मागे उभा होतो, आता धनंजयच्या मागे उभा राहीन. जर जि. प. त अपेक्षाभंग झाला तर काहीही करू, असे सुनावत त्यांनी स्वतंत्र आघाडीच्या चर्चेबाबत हिरवा सिग्नल दिला.

पंडितअण्णा उवाच..
मी गोपीनाथला घडविले?
- गोपीनाथ ११ वीला असताना आमच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हापासून मी त्याला सांभाळले. मग ‘गोपीनाथला मी घडविले की गोपीनाथने मला ?’ याचा विचार तुम्हीच करा. मी माझी ४0 वर्षे आणि धनंजयने स्वत:ची १५ वर्षे गोपीनाथला दिली, हे तरी लक्षात घ्या. ते कर्तृत्ववान आहेत, म्हणून मी ज्येष्ठ भाऊ असूनही मी कार्यकर्ता म्हणून त्यांच्या मागे सावलीसारखा वावरलो.

धनंजयला नितीन गडकरींनी आमदार केले ?
- धनंजयला आमदार गोपीनाथरावांनी नाही तर नितीन गडकरींनी केले. धनंजयच्या उमेदवारीची घोषणा झाली तेव्हा खा. मुंडे परदेशात होते. भाजपाबरोबर राष्ट्रवादीची मते मिळवित धनंजय विधान परिषदेचे आमदार झाले. विधान परिषदेसारख्या निवडणुकीत मी चार-चार विनंत्या केल्यावर शेवटचे तीन दिवस ते आले. उलट विधानसभेला धनंजयला सोडून पंकजाला तिकिट दिल्याची घोषणा मी स्वत: पत्रकार परिषद घेऊन केली होती ती घर तुटू नये म्हणूनच. शिवाय तिला २५ हजारापेक्षा जास्त मतांनी म्हणजे गोपीनाथरावांपेक्षा जास्त मतांनी निवडून आणले. तुम्ही तर जुगलकिशोरला घरात दत्तक घेतल्यासारखे त्याच्या अध्यक्षपदासाठी अडून बसले ना !

मुंडेसाठी मी आणि धनंजयने वार झेलले?
- आम्ही खा. गोपीनाथसाठी आमच्या अंगावर वार झेलले. ९९ च्या विधानसभेला घाटनांदूरमध्ये माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला. माझे जाऊ द्या, धनंजयवर ३0७ च्या तेरा पोलिस केस आहेत. तो आणि मी दोघेही कोर्टाच्या वार्‍या करतो आहोत. ही सारी राजकीय भांडणे होती, जी आम्ही गोपीनाथसाठी केली. मी माझा मुलगा वयाच्या २0 व्या वर्षी गोपीनाथला राजकारणासाठी दिला. त्याला २३ व्या वर्षापासून शुगर, बी.पी. सारखे आजार दिले.

धनंजय स्वत:च्या कत्र्वृत्वाने पुढे गेला?
- धनंजयच्या राजकीय वाटचालीत गोपीनाथपेक्षा त्याचे कर्तृृत्वही आहे. मुंडेंचा पुतण्या म्हणून पदे मिळाली असती तर थेट भाजयुमोचे राज्य - राष्ट्रीयचे अध्यक्षपद का मिळाले नाही ? आधी उपाध्यक्ष, मग सरचिटणीस आणि नंतर प्रांताध्यक्ष अशी चढती कमान धनंजयच्या कामामुळे पदे मिळाल्याचेच सांगते. आमदार करण्यातही त्यांच्यापेक्षा नितीन गडकरींचाच वाटा मोठा आहे. खोटं वाटलं तर लावू का फोन ?

माझ्या घरात आई आहे, तिला तरी भेटला का?
- आम्ही गोपीनाथच्या घरी पाचशेवेळा गेलो. शंभरवेळा विनंत्या केल्या. पण ते आमच्याकडे येत नाहीत. ते परळीला शंभरवेळा आले. पण, माझ्या घरात आई आहे. तिला भेटायला तरी आला का ? फक्त माझ्या घरात आहे म्हणून स्वत:च्या आईलाही भेटावे वाटत नाही का ?

गोपीनाथची पत्नी मला ढोंगी म्हणते..!
- मी आजारी पडून पुण्याच्या रुग्णालयात जीवन-मरणाशी संघर्ष करीत होतो आणि गोपीनाथची पत्नी मला आजारबिजार नाही तर ढोंग करतात म्हणाली. मला गोपीनाथ भेटायला कधी आला ? मी सून म्हणून घरात तिचे स्वागत केले आणि मुलगी म्हणून मान दिला ना.

नाते तुटल्याची गोपीनाथची एकतर्फी घोषणा
- नाते तुटल्याची घोषणा आम्ही केली नाही. भगवानगडावर मेळावा घेऊन गोपीनाथने एकतर्फीच सांगितले. समाजाचा एवढा पुळका आहे तर मग परळी नगरपरिषदेतला समाजाचा एकतरी नगरसेवक मागे आहे का ?

भगवानगडावरून राजकारण का ?
- मी भगवानगडावरून राजकारण करीत नाही, अशी घोषणा खा. मुंडेंनी अनेकवेळा केली. पण गडाचा प्रत्येक वेळी राजकीय वापर केला. हा कालचा मेळावा त्याचीच साक्ष आहे. हा खोटारडेपणा का करता ?

0 comments:

Post a Comment