Meet your Life Partner

Search Your World

Saturday, February 11, 2012

यंदाचा "व्हॅलेंटाइन डे' जल्लोषात

मुंबई - महापालिकांच्या निवडणुका तोंडावर असताना तरुण मतदारांना दुखावणे योग्य नाही, या विचारातून शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच भारतीय जनता पक्ष वा कोणत्याही हिंदुत्ववादी संघटना या वर्षी "व्हॅलेंटाइन डे'ला विरोध करणार नाहीत, असे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे पुढील मंगळवारी (14 फेब्रुवारी) रोजी व्हॅलेंटाइन डे मुंबईसह राज्यात कोणत्याही गोंधळाविना, शांततेत तसेच मोठ्या उत्साहात साजरा होऊ शकेल. यंदाच्या व्हॅलेंटाइन डेसाठी मुंबई, पुणे, नाशिक आदी शहरांतील गिफ्ट्‌सची दुकाने आतापासूनच सजली आहे. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने यंदा बाजारात नवनव्या भेटवस्तूही बाजारात आल्या आहेत. असे चित्र असताना एकाही राजकीय पक्षाने व्हॅलेंटाइन डेविषयी एक चकार शब्दही काढलेला नाही; अन्यथा दरवर्षी दुकानांची नासधूस करणे, मारहाण करणे हे प्रकार आधीपासूनच सुरू होतात आणि त्यामुळे दुकानमालक घाबरून असतात.

यंदा मात्र असे प्रकार होणार नाहीत, याची खात्री असल्याने गिफ्ट्‌स शॉप सजली आहेत. व्हॅलेंटाइन डेनंतर दोनच दिवसांनी 10 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष व कार्यकर्ते प्रचारात गुंतले आहेत. व्हॅलेंटाइन डेला विरोध केल्यास तरुण मतदार आपल्यापासून दूर जातील, अशी भीती काही राजकीय पक्षांना वाटत आहे. मंगळवारी व्हॅलेंटाइन डे आहे, हे नेत्यांच्या वा कार्यकर्त्यांच्या लक्षातही नाही, असे त्यांच्याशी बोलताना जाणवले.
आम्ही यंदा निवडणुकांमुळे निर्धास्त आहोत, असे काही दुकानदारांनी बोलूनच दाखवले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही यंदा आम्ही व्हॅलेंटाइन डेला विरोध करण्याच्या भानगडीत पडणार नाही, असे स्पष्ट सांगितले. एक नेता म्हणाला, सध्या आम्हाला व्हॅलेंटाइन डेचा विचार करायला वेळही नाही. पुढील वर्षी वाटल्यास आम्ही कदाचित विरोध करू; पण यंदा आमच्या नजरा केवळ आणि केवळ निवडणुकांवरच आहेत. शिवाय तरुण पिढीला सोबत घ्यायचे असेल तर त्यांच्या भावनांचा विचारही आम्हाला यापुढे करावाच लागेल. 

0 comments:

Post a Comment