मुंबई। दि. २२ (प्रतिनिधी) ‘अमितजी और रमेश सिप्पी साहब मुझे माफ करना. आपके ‘शोले’ का नाम लेके मैने ‘मालेगाव के शोले’ फिल्म सिर्फ पचास हजार रुपये मे बनाई और दो लाख रुपये कमाये..’ मनोरंजन विभागातून लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ठरलेला शेख नासीर शेख नियाजच्या या भाष्यावर सभागृहात खळखळ उडाली आणि खुद्द अमिताभ बच्चन यांनीही त्याला मनापासून दाद दिली. तीन राष्ट्रीय पारितोषिके मिळवणारे चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी शेख नासीर शेख नियाज याची विजेता म्हणून घोषणा केली आणि मालेगावमध्ये मॉलीवूड प्रतिचित्रसृष्टी निर्माण करणारा शेख नासीर टाळ्यांच्या गजरात व्यासपीठावर आला. राष्ट्राध्यक्षा प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, ‘या पुरस्कारायोग्य समजल्याने मी ज्युरींचा आणि जनतेचा आभारी आहे. त्याचबरोबर माझी आई, बहीण आणि मित्रांचेही मला आभार मानले पाहिजेत. चित्रपटाचे आकर्षण सर्वांनाच असते. मीही एक त्यातलाच. पार्लरमध्ये काम करता करता मी चित्रपटनिर्मितीकडे कधी वळलो ते मला समजलेच नाही. मालेगावात राहून चित्रपट का तयार करू शकत नाही, असे मला राहून राहून वाटत होते. त्याच अस्वस्थेतून ‘मालेगाव के शोले’ तयार केला. प्रेक्षकांची वाहवा मिळाली. त्यातून स्फूर्ती मिळाल्याने ‘मालेगाव का सुपरमॅन’ची निर्मिती झाली. आतापर्यंतच्या लहानशा वाटचालीची दखल घेत लोकमतने मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल मी आभारी आहे. खरे म्हणजे या पुरस्काराने माझ्यावरची जबाबदारी आणखी वाढली आहे. माझ्या डोळ्यांत चित्रपटांबद्दलची अनेक स्वप्ने फेर धरून नाचताहेत. ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने यापुढचे पहिले पाऊल म्हणजे मालेगाव का स्पायडरमॅनची निर्मिती. ज्या दिवशी तो पडद्यावर झळकेल, तेव्हा त्यापुढच्या चित्रपटनिर्मितीला मी लागलेला असेन. |
0 comments:
Post a Comment